ऊन सणसणीत तापलय! दुपारी सुस्त झाल्या आहेत. मुलांच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. संध्याकाळी कोमट आणि रात्री उकाड्याच्या आहेत. सा-यांनाच वेध आता लागले आहेत ते उन्हाळ्यातील फळांच्या राजाच्या आगमनाचे, रसाळ हापूस व आमरसाचे! हापूस च्या आगमनाने उन्हाळा देखील सुखावून जातो. पण येवढा वेळ काढून, मार्केटला जाउन किंवा वर्षानुवर्षाच्या एकमेव आंबेवाल्याला वारंवार विचारत खरेदी केलेला महागडा टपोरा आंबा देवगड हापूसच आहे ना ?
आता देवगड हापूसच्या ‘ओरीजिनलीटी’ विषयी साशंक रहायची गरज नाही. आता ग्राहकाच्या खात्रीसाठी व नकली आंबा देवगड च्या नावाखाली विकला जाऊ नये म्हणून देवगड हापूस डिजीटल होतोय!
आता प्रत्येक खराखुरा देवगड अल्फान्सो हापूस ‘टीपी सील ( टीपी-टॅम्परप्रुफ) / स्टीकर लावलेला असेल. आता हे सील/स्टीकर सुस्थितीत आहे हे तपासले की आपले काम झाले. या स्टीकरवर दोन भागात विभागलेला एक ‘युनिक अल्फान्युमेरीक कोड’ असतो. ज्याचा फोटो व्हाॅटसअप वरून एका विविक्षित नंबरला पाठवल्यास सीलच्या खाली दिलेला नंबर पाठवा अशी कमांड येते तो नंबर पाठवल्यास आणि जुळल्यास उत्पादक शेतक-याचे नाव,गावाचे नाव, जीआय रजिस्ट्रेशन नंबर येतो.
देवगड तालूका आंबा उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड-अधिकृत अल्फान्सो जीआय (जिओग्राफिकल इंडीकेशन – हे एक भौगोलिक मानांकन आहे. विशिष्ट प्रदेशातील उत्पादनांना दिलेले एक खासचिन्ह. जे त्या उत्पादनाच्या भौगोलिक स्थानाशी संबंधित आहे आणि त्या उत्पादनाची ओळख आणि गुणवत्ता दर्शवते) उत्पादक व संरक्षक यांनी यासाठी आता ‘डिजीटल सिल’ आणले आहे.
या नवीन नियमानुसार आता प्रत्येक खराखुरा देवगड हापूस जीआय प्रमाणित स्टीकर त्याच्या गोड गालावर दिमाखात मिरवेल. या सील/स्टीकरसह कोणतीही छेडछाड करता येणार नाही.
ॲडव्होकेट ओंकार एम सप्रे – बोर्ड सदस्य, देवगड हापूस उत्पादक सहकारी सोसायटी म्हणाले की असामान्य सुगंध आणि चविष्टपणामुळे देवगड अल्फान्सो गेल्या शंभर वर्षापासून सुप्रसिद्ध आहे. दुर्दैवाने कष्टाळू देवगड हापूस आंबा उत्पादकाच्या हक्काच्या मार्केट मधे इतर ठिकाणाहून व परप्रांतातून आलेला जवळपास 80% नकली आंबा देवगड हापूस च्या नावाखाली विकला जात आहे व आर्थिक नुकसान करत आहे.