संशोधन, साॅफ्टवेअर, नवीन धाडसी प्रयोग, अवकाश अभ्यास यामध्ये भारतीय माणूस जराही कमी नाही याचे प्रत्यंतर वारंवार येते. काही दिवसपूर्वीच भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स 9 महीने अंतराळ स्थानकात राहून परतल्या आहेत. आता अंतराळ मोहीमेत जाण्यासाठी आणखीन चार भारतीय सज्ज झाले आहेत. भारतीय हवाई दलात कार्यरत असणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल हे मिशन 4 ए एक्स डॅश 4 या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. शुक्ल हे भारतीय हवाई दलातील अनुभवी पायलट आहेत.
राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल 40 वर्षांनी एक भारतीय – शुभांशू शुक्ल हे अंतराळात, ते ही अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी उड्डाण करणार आहे. या आधी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी 1984 मधे अंतराळात उड्डाण केले होते. शुभांशू शुक्ल यांच्यासह पेगी व्हीटसन्, स्लॅवोज उझनान्स्की-विजनीव्स्की व टीबोर कापू यांचा या मोहिमेत समावेश आहे. भारताच्या आगामी ‘गगनयान मिशन’साठी भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो च्या त्यांच्या निवडीनंतर नासा ने त्यांची निवड केली आहे.
39 वर्षांचे शुभांशू 10 ऑक्टोबर 1985 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौला जन्मलेले आहेत. 1998 च्या कारगील युद्धामुळे त्यांना सेनेत जाण्याची प्रेरणा मिळाली. NDA चा फाॅर्म त्यांनी घरच्यांना न सांगताच भरला होता. 2005 मधे त्यांनी NDA तून कॅडेट बेसिक ट्रेनिंग व अभियांत्रिकीतील बी टेक उत्तीर्ण केले. त्यानंतर ते भारतीय वायुसेना अकादमीत दाखल झाले. भारतीय वायुसेनेत एक लढाऊ नेता व अनुभवी वैमानिक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. त्यांच्या नावे तब्बल 2000 तास उड्डाणाचा अनुभव आहे. अंतराळवीराचे मुलभूत प्रशिक्षण त्यांनी रशियात व नंतर बेंगरूळूत घेतले आहे. दरम्यान एरोस्पेस इंजिनिअरिंग मधे पोस्ट ग्रॅज्युएशन केले. शुभांशुंच्या पत्नी डाॅ कामना या डेंटिस्ट असून त्यांना 4 वर्षाचा मुलगा आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे अज्ञेयवादी- (ईश्वराचे अस्तित्वाचे आकलन मानवी तर्काच्या ताकदीबाहेरचे आहे ) असुनही कुंडलीशास्त्रात त्यांना अलिकडेच रस निर्माण झाला आहे.
स्पेस एक्स् ड्रॅगन अंतराळ यानात मिशन पायलट म्हणून ते काम पाहणार आहेत. या यानाचे प्रक्षेपण मे 2025 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून पार पडणार आहे.
शुक्ल यांच्यासह चार भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत. प्रशांत बाळकृष्ण नायर, अजित कृष्णन, अनंत प्रताप अशी त्यांची नावे आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणीक उपक्रम आणि व्यवसायिक कार्य हा या मोहिमेचा हेतू आहे. ही मोहीम 14 दिवसाची आहे.






